मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदावरील निवडीला संगमा यांचे आव्हान

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना प्रणव मुखर्जी यांच्याकडे लाभाचे पद असल्याचा आरोप करून त्यांचे प्रतिस्पर्धी पी. ए. संगमा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संगमा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून मुखर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना मुखर्जी हे इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी या पदाचा राजीनामा अर्ज दाखल केल्यानंतर दिला; असा संगमा यांचा दावा आहे.

यामुळे मुखर्जी यांची राष्ट्रपती पदावरील निवड बेकायदेशीर ठरवून त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करावे आणि संगमा यांना राष्ट्रपती घोषित करावे; अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.