अपप्रचाराची मुळे शोधण्यासाठी अमेरिकेची मदत घेणार

नवी दिल्ली: अल्पसंख्यांकांच्या भावना भडकावणारा मजकूर पाकिस्तानमधून सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करण्यात आल्याची माहिती फेसाबोक आणि युट्यूब या वेबसाईट्सकडून मिळाल्याचे इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे. या अपप्रचाराच्या मुळाशी जाण्यासाठी भारताकडून अमेरिकेच्या संरक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे.

आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वेबसाईट्स आणि ब्लॉग्जवर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रण अपलोड करून भावना भडकावण्यात आल्या. या मजकुराचा तपशील प्राप्त करून वेबसाईट्सचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र शासनाचा इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग विविध वेबसाईट्सच्या संपर्कात आहे. पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून ‘शेजारी राष्ट्रातून वेबसाईट्सवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आल्याचे वेबसाईट्सच्या व्यवस्थापनांनी या विभागाला कळविले आहे.

अल्पसंख्यांच्या भावना भडकवण्यासाठी वापरण्यात आलेले छायाचित्रण बनावट असून त्याचा आसाममधील हिंसाचाराशी दूरान्वयानेही संबंध नाही; असेही इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे. बनावट सर्व्हर्स आणि वापरकर्त्यांचे नाव गुप्त ठेवणार्‍या व्हर्च्युअल नेटवर्क्सचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आल्याचे इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आले आहे.

हा अपप्रचार रोखण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात आणि वेगवान कारवाईची गरज असल्याचे इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने सरकारला सदर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.