पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भाजप ठाम

नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भारतीय जनता पक्ष ठाम राहणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लाखो कोटींचे घोटाळे घडूनही मनमोहन सिंग सरकार भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोळसा खाण घोटाळ्याबाबत केगाने सरकारवर ओढलेले ताशेरे गंभीर असून हे सरकार घोटाळेबाज, भ्रष्टाचारी आणि लुटारूंचे आहे; असा आरोप प्रसाद यांनी केला आहे. २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबद्दल भाजप आणि प्रसारमाध्यमांनी काटेकोर पाठपुरावा केला नसता तर तो घोटाळाही दडपला गेला असता; असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान दीर्घकाळ खाण घोटाळ्याशी संबंधित मंत्रालयाचे मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी या घोटाळ्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देणे आवश्यक आहे; असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही खाण घोटाळ्याची उच्च्स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मात्र कोळसा खाण घोटाळ्यात पंतप्रधानांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी कशाच्या आधारावर केली जाते; असा सवाल काँग्रेसने केला आहे.

Leave a Comment