उभा देश ईशान्य भारतीयांच्या मागे: संसदेची ग्वाही

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना प्रदान करण्यासाठी केंद्रशासन संपूर्ण प्रयत्न करेल; अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. या दृष्टीने केल्या जाणार्‍या प्रयत्नांना राजकीय रंग न देता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ईशान्य भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून काही विघातक शक्ती देशाच्या एकात्मतेला आव्हान देऊ पहात आहेत. मात्र केंद्रशासन देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे; असे पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले. असुरक्षिततेच्या भावनेतून बंगळूरू आणि पुण्यासारख्या ठिकाणाहून हजारो ईशान्य भारतीय निघून जात आहेत; ही बाब खेदजनक असल्याचेही ते म्हणाले.

रमजान ईदनंतर ईशान्य भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होणार असल्याची अफवा देशभर पसरविली जात आहे. या अफवेमुळे भयभयीत झालेले ईशान्य भारतीय विद्यार्थी, नोकरदार भारताच्या विविध भागातून आपल्या मूळ प्रदेशाकडे परत जात आहेत.

संसदेचे कामकाज सुरू होताच शुक्रवारी दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देश ईशान्य भारतीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे;अशी भावना निर्माण करण्याची गरज सर्वपक्षीय सदस्यांनी यावेळी एकमुखाने व्यक्त केली.

ईशान्य भारतीयांसाठी शासनाने हेल्पलाईन सुरू करावी आणि वसतिगृहे, मॉल्स अशा ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा; अशी मागणी भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी केली.