अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी हिलरी किलंटन यांची कन्या चेल्सा राजकारणाबाबत पॉझिटिव्ह विचार करू लागली असल्याचे आता समोर येत आहे. कांही काळापूर्वी राजकारणात येणार का या प्रश्नाला तिने क्षणाचाही विचार न करता राजकारणात येणार नाही असे उत्तर दिले होते. हिलरी क्लिंटन यांचा २००८ साली प्रसिडेंटपदासाठी निवडणूक प्रचार करतानाही चेल्साचे हेच मत कायम होते. मात्र आता तिचे मत बदलत चालले आहे. एक मासिकाला मुलाखत देताना राजकारणात प्रवेश करणार का या प्रश्नाला तिने आत्ताच कांही सांगता येत नाही असे राजकारणी उत्तर दिले आहे.
राजकारणात आले की आपल्याला मते देणार्या मतदारांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. मतदारांना आपल्या नेत्याने सारे आयुष्य राजकारणासाठीच द्यावे अशी अपेक्षा असते असे सांगून चेल्सा म्हणाली की आईचा प्रचार करताना मी हा अनुभव घेतला आहे. मतदानासाठी पात्र झाल्यानंतर प्रत्येक निवडणूकीत मतदानही केले आहे आणि त्यामुळे एक मतदार म्हणून मला मतदारांच्या अपेक्षा जाणून घेता येतात. अर्थात राजकारणात येईना याबद्दल सध्या कांही सांगता येत नाही. बत्तीस वर्षीय चेल्सा आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात डॉक्टरेट करत आहे. जग अधिक न्यायनिष्ठ आणि समतावादी असावे अशी तिची अपेक्षा आहे.