मांजराच्या गुरगुरण्याचे संशोधकांना कोडे

पाळीव प्राण्यांच्या यादीत मांजरांच्या नंबर बराच वरचा आहे. परदेशात तर या मांजरांचे फॅशन शो सुद्धा भरतात. मांजरवेड्यांना मांजर पोटातल्या पोटात जो विशिष्ट गुरगुर किवा अगदी हळू आवाजात म्याऊ करते तो आवाज जगातला सर्वात सुंदर आवाज वाटतो असे म्हणतात. मात्र प्राणीशास्त्रज्ञांना या आवाजामागचे कोडे अनेक दशके संशोधन करूनही उलगडता आलेले नाही हे सत्य आहे. मांजराच्या घशातील स्वरयंत्रात अशा प्रकारे आवाज काढण्यासाठी खास यंत्रणा नाही. मांजर हा आवाज काढून त्याचा आनंद व्यक्त करते असे सांगितले जाते. मात्र अनेकवेळा मांजरे अन्य कारणांनीही हा आवाज काढत असतात.

प्राणीतज्ञ यू.सी.डेव्हीस यांचा प्राण्यांच्या वागणुकीबद्ल गाढा अभ्यास आहे. त्यांच्या मते मांजरे हा आवाज केवळ आनंद व्यक्त करताना नाही तर अन्य अनेक कारणांनीही काढतात. जखमा बर्‍या होतानाही मांजरे असा आवाज काढतात. व्हटर्नरी मेडिसिन विषयाचे प्रोफेसर पॉल लेहाऊसन हे मांजरांवर गेली कित्येक दशके संशोधन करत आहेत. त्यांच्या मते मांजरे हा आवाज एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि भांडायचे नाहीये हा संदेश देण्यासाठी काढतात. आणखी एका संशोधनातून असेही समोर आले की माणसाने आपल्याला भरवावे अशी जेव्हा मांजरांची इच्छा असते तेव्हाही मांजरे मऊ आवाजात गुरगुरतात.

स्वीडीश भाषा तज्ञ रॉबर्ट इक्ल्यड यांच्या मते मानवासह सर्वच प्राण्यांवर आवाजाची मोहिनी पडते. इक्लुड यांनी मांजरांचे अनेक आवाज रेकॉर्ड करून त्याचा अभ्यास केला आहे. पाळलेल्या मांजरांच्या आवाजाची पातळी २०.९४ ते २७.२१ हर्टस इतकी असते. त्यातही श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना ही पातळी वेगळी असते. या आवाजातून सुंदर हार्मनी तयार होते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की २० ते १४० हर्टस पातळीतील आवाज हे थेरपिक असतात. म्हणजे हाडांची वाढ, स्नायूंची वाढ, अस्थिभंग, वेदना कमी करणे, सूज कमी करणे, सांध्याच्या सुरळीत हालचाली अशा अनेक प्रकारच्या हिलिंगसाठी ही पातळी फार उपयुक्त असते. मांजरे ज्या आवाजात गुरगुरतात त्याचा उपयोग त्यांना स्वतःचे आजार अथवा वेदना बर्‍या करण्यासाठी होत असतो म्हणून मांजरे गुरगुरतात. नक्की खरे काय कोण जाणे !