हरिद्वार: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेले भाषण एखाद्या व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाने बोलावे तसे मिळमिळीत असल्याची टीका योग गुरू रामदेव बाबा यांनी केली. भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्द न काढण्याची काँग्रेस नेत्यांची परंपरा पंतप्रधानांनी पाळल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल आपल्या भाषणात एकही शब्द काढला नाही. त्यांनी स्वतःचे भाषण न करता दुसर्या कोणीतरी लिहून दिलेले भाषण वाचून दाखविले; अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले. राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊनही प्रणव मुखर्जी यांचे काँग्रेसप्रेम कायम आहे; अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे.
मंगळवारी ६६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीपदावरून देशाला प्रथमंच संबोधित करताना मुखर्जी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांच्या आंदोलनांवर तोफ डागली. अशा आंदोलनांमुळे देशात अराजक निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर बाबांनी राष्ट्रपतींना प्रत्युत्तर दिले आहे.
प्रणव मुखर्जी हे दीर्घकाळ काँग्रेसवासी होते. राष्ट्रपती झाल्यावरदेखील या पदाला आवश्यक असलेली पक्षनिरपेक्षता अजून त्यांच्या अंगी भिनलेली नाही; अशी टीका रामदेव बाबांनी केली.