नवी दिल्ली: भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात योग गुरू रामदेव बाबा यांनी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी दलित मुलीच्या हातून लिंबू पाणी प्राशन करून सोडले. उपोषण सोडले तरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रामदेव बाबा हरिद्वारकडे रवाना झाले आहेत.
रामदेव बाबांनी उपोषण सोडले
या आंदोलनात आपण हरलेलो नाही. आपल्य मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच रहाणार आहे; असा इशारा देताना रामदेव बाबांनी; पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना विदेशातील काळा पैसा परत आणण्याबाबत निवेदन करावे; अशी मागणीही केली आहे.
रामलीला मैदान येथे उपोषणाला बसलेले रामदेव बाबा आणि त्यांच्या समर्थकांना जमाव बंदी आदेश मोडल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली. रात्री उशीरा त्यांची मुक्तता केल्याचे सांगूनही रामदेव बाबांनी स्टेडीयम सोडण्यास नकार देऊन आपले उपोषण सुरूच ठेवले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बाबांना आंदोलन मागे घेऊन स्टेडीयम रिकामे करण्याची विनंती पोलिसांनी केली.
मंगळवारी सकाळी बाबांनी उपोषण मागे घेतले.
