विकीलिक्सच्या संस्थापक ज्युलियन असांजे याला इक्वेडोरमध्ये राजकीय आश्रय द्यायचा की नाही यावरचा निर्णय या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे इक्वेडोरचे अध्यक्ष राफेल कोरिया यांनी एका टिव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. राफेल बुधवारी याबाबत सल्लागारांशी चर्चा करणार असून त्यानंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. लंडन आलिंपिक्सच्या स्पर्धा संपल्यानंतरच असांजेच्या विनंतीवर विचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता.
इक्वेडोर – असांजेच्या आश्रयाबाबत या आठवड्यात निर्णय
अध्यक्ष राफेल यांच्या म्हणण्यानुसार असांजेला राजकीय आश्रय देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्व तरतूदी तपासून त्यावर चर्चा करून मगच हा निर्णय घेण्यात येणार आहे.
जून २०११ पासून असांजे लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात असून स्वीडनला आपले हस्तांतरण टाळण्यासाठी त्याने येथे आश्रय घेतला आहे. मूळचा ऑस्ट्रेलियाचा असलेल्या ४१ वर्षीय असांजेने अमेरिकेच्या अति गुप्त फाईल्स विकिलिक्सवर प्रसिद्ध करून अमेरिकेचा रोष ओढवून घेतला आहे तर स्वीडन सरकारने त्याच्यावर लैगिंक छळ केल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे. स्वीडनला हस्तांतरण केले गेले तर आपल्याला अमेरिकेला पाठविले जाईल आणि तेथे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाईल अशी भीती असांजेने तसेच त्याच्या आईने व्यक्त केली असून हे टाळण्यासाठीच इक्वेडोरमध्ये राजकीय आश्रय मागितला आहे.
