समन्वयाचा अभाव

मुंबईत झालेला हिंसाचार किती गंभीर आहे हे आता समोर यायला लागले आहेच पण महाराष्ट्राचे गृहखाते आणि  केन्द्रातले गृहखाते यांच्यात समन्वयाचा किती अभाव आहे आणि कोणाचा कोणाला कसा पत्ता नाही याचे दर्शन गेल्या दोन-तीन दिवसांपासून घडायला लागले आहे. केन्द्राच्या गृहखात्याने या हिंसाचारामागे गुन्हेगारी विश्वाचा हात असल्याचे म्हटले आहे. तसे आहे तर मग राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी वाढते. कारण मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वावर नजर ठेवण्याची जबाबदारी राज्याच्या गृहखात्याची आहे. राज्य सरकारच्या गृहखात्याने याबाबत आपली जबाबदारी पार पाडली नाही असे नाही पण याही खात्याच्या विविध विभागांत समन्वय नसल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने मुंबईत अशा प्रकारे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना पाठवला होता. म्हणजे या विभागाने आपले कर्तव्य पार पाडले आहे. 

 पी.चिदंबरम यांनी केन्द्रीय गृहमंत्री म्हणून काम करताना ते कसे उत्तमरित्या करता येते याचा आदर्श घालून दिला आहे. ते रोज सकाळी गुप्तचर खात्याच्या प्रमुखांशी चर्चा करीत असत आणि देशाचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम करणार्या अधिकार्याशी दिवसातून दोन वेळा विचार विनिमय करीत असत. त्यांना देशातल्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात यश आले या मागे त्यांचा हा सम्नवय कारणीभूत आहे. महाराष्ट्रात असा सन्मवय आहे की नाही याचा काही पत्ता लागत नाही पण, मंत्री म्हणून आर. आर. पाटील कमी पडत आहेत. विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी या मुंबईतल्या या मेळाव्यात हिंसाचार घडेल असा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांना पाठवला होता. या अहवालाची बातमी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाने छापलेली आहे. असा जर अहवाल असेल तर मग पोलिस काय करीत होते ? पोलिसांनी हा अहवाल गांभीर्याने घेतला नाही का ? घेतला नसेल तर का घेतला नाही ? आपल्या अखत्यारीतल्या खात्यात असे गोपनीय अहवाल मिळत असतील तर मग मंत्री म्हणून आर.आर. पाटील अशा अहवालांबाबत काहीच चौकशी करीत नाहीत का ?  

आर. आर. पाटील स्वत: गाफील गृहमंत्री आहेत आणि ते आपल्या अखत्यारीतल्या गृह खात्यातल्या वरिष्ठ अधिकार्यांना सावध ठेवत नाहीत. त्यांच्यावर अनेक प्रकारे टीका होत आहे. ते अकार्यक्षम ठरले आहेत. शिवसेना, मनसे आणि भाजपाने त्यांच्यावर बरीच वैयक्तिक टीका केली आहे पण त्यातली वावदूक भाषा सोडून दिली तर असे नेमकेपणाने म्हणता येईल की त्यांना या खात्यात चांगला समन्वय साधता येत नाही. आपल्या खात्याचा एक विभाग शहरात अशांतता निर्माण होईल असा इशारा देणारा अहवाल सादर करतो आणि तो सादर झालेला विभाग त्याची दखल घेत नाही.असे होत असेल तर मग तशी ती घेतली जाईल यासाठी गृहमंत्र्यांनीच काही तरी करायला हवे होते.पी. चिदंबरम यांनी हे समन्वय साधण्याचे काम केले होते. तेवढी तत्परता आर. आर. पाटील यांना दाखवता आली नाही. राज ठाकरे यांनी आराराबांवर टीका करताना, ते शेपटी घालणारे मंत्री असल्याचे म्हटले. त्याला उत्तर देताना आराराबांनी आपण शेपटी घालणारे नव्हे तर शेपटी पिरगाळणारे मंत्री आहोत असे सडेतोड उत्तर दिले.  अर्थात हा नुसता शब्दांचा खेळ आहे. आर. आर. पाटील हे शेपटी पिरगळणारे मंत्री आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने कधीच सिद्ध केलेले नाही.  

२००८ सालच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी आराराबांच्या कथित शेपट्या पिरगळण्याचे पूर्ण वस्त्रहरण झाले होते. त्यावेळी त्यांना राजीनामा द्यायला लावले होते.आपल्याला ही शिक्षा मिळाली याचा त्यांनी काय विचार केला ? आपल्या अकार्यक्षमतेने भारताची जगात नाचक्की करणारा हा हल्ला झाला. आपल्याला तरीही पुन्हा हेच खाते देण्यात आले आहे. आता ते दुसर्यांदा देताना आपल्या कडून काही अपेक्षा व्यक्त होत असणार याचा विचार करून त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत काही बदल केला आहे का आणि केला असल्यास तो काय आहे याचा कधीच खुलासा झालेला नाही. मग आबांची अवस्था पूर्वीसारखीच असेल तर पुन्हा पुन्हा हल्ले होत राहणार आहेत. ते होत आहेत याचाच अर्थ त्यांना आपल्या कामात काही बदल करता आलेला नाही.

आबा हा आपल्या राज्यात चर्चेचा विषय झाला आहे आणि ते आता शरद पवारांसह सर्वांच्या मनातून उतरले आहेत. पवारांनी त्यांना फटकारले तेव्हा अजित दादांनी कुरवाळले असे म्हटले जात आहे. पण दादांनी त्यांना का कुरवाळले हे काही कळले नाही. कारण शरद पवारांनी त्यांना फटकारले हेच योग्य होते. शरद पवार हा माणूस प्रशासनातल्या बारीक सारीक गोष्टी जाणणारा आहे. त्यांना आराराबांचे नेमके काय चुकत आहे याची बरोबर कल्पना आहे.म्हणून त्यांनी फटकारले मात्र त्यांना चुचकारताना दादांनी त्यांच्यात काय पाहिले हे काही कळले नाही. उलट मुंबईत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आबांची अकार्यक्षमता अधिकच उजागर झाली आहे. आबा कितीही जोरकसपणे आपण शेपट्या पिरगाळणारे असल्याचे म्हणत असले तरी कोणत्याही दहशतवादी कारवाईत त्यांनी दहशतवाद्यांच्या शेपट्या पिरगाळणे तर दूरच पण त्यांच्या शेपटीला साधा हातही लावला नाही. ते दहशतवादी  म्हणताच नरम पडतात की काय हे काही कळत नाही. आताही मुंबईत हिंसाचारास जबाबदार असलेल्यांना ते काही बोलत नाहीत. त्यांनी मुंबईत हिंसाचार घडवणार्यांच्या शेपट्या पिरगाळू असे म्हणून तरी दाखवावे. ते जमत नसेल तर घरी जाऊन शेती करावी आणि तिथे बैलांच्या शेपट्या पिरगाळून आपली शेपट्या पिरगळण्याची ताकद तिथे दाखवून द्यावी. 

 

Leave a Comment