सोमालिया दि.१३- अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या मार्गदर्शनानुसार काम करणार्या अल शबाब या सोमाली दहशतवादी संघटनेने सात ते दहा वयोगटातील मुलांचे अपहरण करून त्यांना आत्मघातकी बॉम्ब बनण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. मानवी बॉम्ब बनण्यासाठी या मुलांचे ब्रेन वॉशिंग केले गेले आहे. भविष्यात पाश्चिमात्य देशांवर हल्ले चढविण्याची ही तयारी असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
मानवी बॉम्बसाठी अल्पवयीन मुलांचे अपहरण
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सोमालियातील अशांततेचा फायदा अल कायदा ही दहशतवादी संघटना घेत असून त्यांनी तेथे सोमाली अल शबाबा ही दहशतवादी संघटना आपल्या नियंत्रणात घेतली आहे. या संघटनेने देशभरातील ७ ते १० वयोगटातील मुले पळवून नेली आहेत. त्यांना शाळेत बेडला साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहे आणि या मुलंाना आत्मघातकी बॉम्ब बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. असे बॉम्ब बनून तुम्ही मेलात तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल असेही या मुलांना सांगण्यात आले आहे. नील डोयल याने दहशतवाद्यांचा तपास लावण्यासाठी घेतलेल्या शोधातून ही माहिती मिळाली. नीलने या मुलांची चित्रेच मोगादिशू अधिकार्यांना सादर केल्यानंतर त्या त्या ठिकाणी छापे टाकून या मुलांची सुटका करण्यात आली.
छापे टाकताना दोषी आढळलेल्या २०० जणांना अटक करण्यात आली असल्याचेही समजते. मात्र ज्या शाळांत ही मुले साखळ्यांनी बांधलेली होती तेथील शिक्षकांनी मात्र वर्ग बुडविल्याबद्दल त्यांना ही शिक्षा देण्यात आल्याचे सुरवातीस सांगितले होते. प्रत्यक्ष तपासात मात्र ही मुले आत्मघातकी बॉम्ब बनण्यासाठी आणली होती हे स्पष्ट झाले. मोगादिशूतील सरकारी वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्यात आठ सोमाली सरकारी पथके ठार झाली होती. या हल्ल्याची जबाबदारी जेव्हा अल शबाबाने स्वीकारली तेव्हाच या कारस्थानाचा पत्ता लागला असे सांगण्यात येत आहे.
