मोटरोला मोबिलीटीत नोकरकपात

सनव्हीले दि.१३- मोबाईल उत्पादनात एक काळ अग्रणी असलेल्या मोटरोला मोबिलीटीने जगभरात ४००० कामगारांना नोकरीवरून काढण्यात येत असल्याचे तसेच जगभरातील कार्यालयांपैकी ९४ कार्यालये बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. मोटोरोला कंपनीला पूर्वपदावर आणण्यासाठी केली गेलेली ही पहिली उपाययोजना असल्याचे गुगलने जाहीर केले आहे.

गुगलचे एक्झिक्युटिव्ह लॅरी पेज याने मोटोरोला १२.५ दशलक्ष डॉलर्सना खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता पण त्यामागे मोटोरोला कडे असलेली विविध प्रकारची १७ हजार पेटंट हे मुख्य कारण होते. मोटोरोला त्यांचे प्रतिस्पर्धी अॅपल आणि सॅमसंग यांच्या तुलनेत खूपच मागे पडले असून संशोधनातही त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. कंपनीत करण्यात येणार्‍या ४ हजार नोकरांच्या कपातीतील १/३ कपात अमेरिकेत करण्यात येत आहे. कंपनी त्यांच्यासाठी तोट्याची ठरलेली मार्केटही सोडणार आहे. तसेच डझनावारी मोबाईल फोन तयार करण्यापेक्षा निवडक मॉडेल्सवरच अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मोटोरोलाचे नवे चीफ एक्झिक्युटिव्ह डेनिस वुडसाईड यांनी सांगितले.

शिकागो येथे १९२८ साली स्थापन झालेल्या मोटोरोलाने आपला पहिला कमर्शियल सेलफोन १९७३ मध्ये बाजारात आणला. त्यावेळी बाजारात त्यांची धूम होती मात्र नंतर अॅपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी त्यांचे ग्राहक मोठ्या प्रमाणात खेचले व त्यानंतर कंपनीचे विभाजन झाले. मोटोरोला विकत घेण्यामागे अँड्रेईड ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करून स्वतःचा चांगला स्मार्टफोन व टॅब्लेट बनविण्याचा गुगलचा उद्देश आहे असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment