नवी दिल्ली दि.१३ – योगगुरु रामदेवबाबा यांना त्यांच्या हजारो समर्थकांसह पार्लमेंटवर मोर्चा नेट असताना दिल्ली पोलिसांनी दुपारी अटक केली. हा मोर्चा पार्लमेंटवर पोहोचण्या पूर्वीच रणजितसिंग उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. रामदेवबाबा आणि त्यांच्या समर्थकांना राजेंद्रप्रसाद स्टेडीयमवर ठेवण्यात आले आहे.
योगगुरू रामदेवबाबा यांनी रामलीला मैदानावरच्या त्यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी आज म्हणजे सोमवारी समर्थकांना काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले होते व पार्लमेंटवर नेण्यात येणार्या मोर्चात व तेथे करण्यात येणार्या निदर्शनातही सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आपल्या भाषणात रामदेवबाबा म्हणाले की काँग्रेस पक्ष हे बुडते जहाज आहे. त्यांच्या नियंत्रणाखालील सरकार हे मूक बधिर आहेच पण ते अंधही आहे. या सरकारला ऐकू यावे यासाठी पार्लमेंटवरच निदर्शने केली पाहिजेत. काँग्रेसला समर्थन देणार्या सहयोगी पक्षानी पाठिंबा काढून घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले होते.
प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामदेव बाबा यांनी पार्लमेंटवरील मोर्चासाठी परवानगी काढलेली नव्हती. मात्र पोलिसांनी आज जमावबंदी लागू केली होती तसेच पोलीस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला होता. जमावबंदीचा आदेश झुगारून बाबा समर्थकांसह पार्लमेंट कडे निघाले तेव्हाच त्यांना आणि समर्थकांना अटक करण्यात आली.
रामदेवबाबांच्या उपोषणस्थळी आज पाचव्या दिवशी जनता दलाचे नेते डॉ.सुब्रह्मण्यमस्वामी यांनीही उपस्थिती लावली होती.