आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर

मुंबई दि.१३- पुण्यात १ ऑगस्टरोजी झालेली साखळी बॉम्बस्फोट आणि त्यापाठोपाठ मुंबईत आझाद मैदानात उसळलेली दंगल यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याबद्दलची नाराजी तीव्र झाली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केवळ विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांकडूनही केली जात आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात घडत असलेल्या घटनांमुळे सत्ताधारी पक्षात तणावाचे वातावरण आहे. या घटनांचा सारा दोष गृहमंत्रायलाच्या कारभारावर टाकण्यात आला असून राष्ट्रवादीचे संस्थापक व कृषीमंत्री शरद पवार यांनीच त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत पवार यांनी राज्यात ज्या घटना घडल्या त्यामागे गुप्तवार्ता विभागाचे अपयश असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. पुण्यातील स्फोट व मुंबईतील दंगलींमुळे हे अपयश अधिक ठळक झाल्याचे मत व्यक्त करून पवार म्हणाले की मुंबईतील दंगलीबाबत स्थानिक गुप्तवार्ता विभाग गाफील राहिला हेच सत्य आहे. गुप्तवार्ता विभागाला माहिती मिळविण्यात वारंवार येत असलेले अपयश ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही पवार म्हणाले. पुणे स्फोट आणि मुंबई दंगलीबाबत गुप्तवार्ता विभाग पूर्णपणे अनभिज्ञ कसा होता याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरच राम प्रधान कमिटीने गुप्तवार्ता विभागातील गंभीर त्रूटी अहवालात नमूद केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. गेले दहा दिवस मुंबईतील मशिदीतून होत असलेली स्फोटक भाषणे आणि आंदोलनाचा होत असलेला प्रचार याची गुप्तवार्ता विभागाला माहितीच नव्हती असेही दिसून आले आहे. ही बाब राज्यासाठी धोकादायक असून त्याची पूर्ण जबाबदारी गृहमंत्रालयावर व पर्यायाने गृहमंत्र्यांवरच येते. गृहमंत्रीही त्याच्या कामात अॅलर्ट राहिलेले नाहीत असाच त्याचा अर्थ आहे व म्हणूनच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनीही लावून धरली आहे.

विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनीही आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार नाही असे सांगताना मतांसाठी सत्ताधारी पक्षाने अल्पसंख्यांक्यांचे जे तुष्टीकरण चालविले आहे ते पूर्ण थांबणे हेच अधिक गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. या तुष्टीकरणामुळेच कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment