राहुल गांधींचे मंत्रिमंडळात स्वागत: पंतप्रधान

नवी दिल्ली: राहुल गांधी यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची इच्छा असेल; तर त्यांचे स्वागत आहे; असे उद्गार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढले.

काही काळापूर्वीच राहुल गांधी यांना पक्षात किंवा सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. मात्र पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबतचा निर्णय राहुल गांधीच घेतील. त्यांच्यावर आपला निर्णय लादणार नाही; असे जाहीर केले होते; तर स्वत: राहुल गांधी यांनी आपल्यावर कोणती जबाबदारी कधी द्यायची याचा निर्णय पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान घेतील; असे सांगतानाच आपण अशी जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे सूतोवाचही केले होते.

या पार्श्वभूमीवर तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदावर निवड होताच केंद्रीय मंत्रिमंडळात काही पदे रिक्त झाली. त्याचवेळी राहुल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र त्यावेळी केवळ खांदेपालट करून मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

आता पंतप्रधान सिंग यांच्या नवीन वक्तव्याने राहुल गांधींवर मोठी जबाबदारी देण्याबाबत काहीसा मागे पडलेला विषय पुन्हा चर्चेत आला आहे.