राजा परवेझ अश्रफांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात

इस्लामाबाद, दि. ९ – पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात आली आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या विरोधातील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यावरुन सरकार आणि न्यायपालिका हे पुन्हा एकदा एकमेंकासमोर उभे ठाकले आहेत.  

झरदारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने अश्रफ यांना बुधवारी नोटिस दिली. या नोटिशीत कोर्टाने म्हटले होते की, पंतप्रधान अश्रफ यांनी कोर्टाने आदेश न पाळल्याने त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला सुरु का करु नये?. याचबरोबर अश्रफ यांनी २७ ऑगस्टला होणार्या सुनावणी दरम्यान कोर्टात हजर रहावे.  

राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींच्या खटल्यावरून पाकिस्तान सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. झरदारींविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाने लकडा लावला असून सत्ताधारी पाकिस्तानी पीपल्स पार्टीने त्यास वारंवार नकार दिला आहे. याप्रकरणी अश्रफ न्यायालयात सरकारची बाजू मांडली आहे. त्यांनी झरदारींवर खटला भरण्यास नकार दिल्यास अशरफ यांनाही माजी पंतप्रधान गिलानींप्रमाणे अपात्र ठरवले जाण्याचा धोका आहे. निर्धारित कालावधीनुसार पाकिस्तानात पुढील वर्षी म्हणजे सन २०१३ च्या मार्च-एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

अशरफ यांना पत्रकारांनी खोदून खोदून विचारले असता निवडणुका फार दूर नाहीत, असे त्यांनी सूचित केले. पाकिस्तानी लोकशाहीसमोरील आव्हाने पाहता संसद बळकट करण्यासाठी मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात निवडणुका हाच एकमेव मार्ग आहे. निवडणुका आता फार दूर नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी केले.

सर्वोच्च न्यायालय आणि सरकारमधील तणावाचे संबंध पाहता अशरफ यांनी केलेले विधान म्हणजे मुदतपूर्व निवडणुकांचे संकेत मानले जाते.