पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींची ओळख पटली

पुणे दि.७ – पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात १ ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी शोधपथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आल्याचे  वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून समजले आहे. विशेष म्हणजे सीसीटिव्हीच्या फूटेजमधूनच आरोपींचा माग काढण्यात आला आहे. जंगली महाराज रोड आणि फडके हौद परिसरातील सीसीटिव्हींचे फूटेज पुणे गुन्हा अन्वेषण विभागाने दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविले होते आणि ते तपासत असतानाच दहशतवाद विरोधी पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे समजते.

पुण्यात स्फोट झाल्यानंतर ज्या सायकलींत हे बॉम्ब ठेवण्यात आले होते, त्या सायकली ज्या दुकानातून खरेदी केल्या गेल्या त्याचा तपास पोलिसांनी लावला होता. दोन सायकलींच्या खरेदींचा तपास लागला होता मात्र तिसरी सायकल कुठल्या दुकानातून खरेदी केली गेली त्याचा तपास लागत नव्हता. मात्र गुन्हा अन्वेषण विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाने या तिसर्‍या दुकानाचाही शोध लावला. या दुकानांतून असलेले सीसीटिव्ही, ही दुकाने ज्या भागात आहेत त्या फडके हौद परिसरातील सीसीटिव्ही आणि जंगली महाराज रोडवरील सीसीटिव्ही त्याचबरोबर शहराच्या विविध भागातील सीसीटिव्हींचे फूटेज तपासण्यात आले तेव्हा संशयित आरोपींची ओळख दहशतववाद विरोधी पथकाला पटली असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात याबाबत अधिक कांही सांगण्यास या अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

दरम्यान बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या रसायनाचे व अन्य नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले होते त्याचाही अहवाल आज पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे तपासाला निश्चित दिशा मिळेल असे सांगण्यात येत आहे.