मुंबई दि. ७- मुंबईचे आकर्षण म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या वरळी सी लिंकची ख्याती आता आत्महत्त्या स्पॉट म्हणून होईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत असून आठवड्याच्या कालावधीत या सी लिंकवरून दोन जणांनी आत्महत्त्या केल्या आहेत.
वरळी सी लिंकवरून दुसरी आत्महत्त्या
गेल्याच आठवड्यात राज टॅव्हल्स कंपनीचे मालक ललित सेठ यांनी वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्त्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास एका ३५ वर्षीय युवकानेही याच सी लिंक वरून उडी मारून आत्महत्त्या केली. मात्र त्याची ओळख पटू शकलेली नाही.
सी लिंक वरील सुरक्षारक्षक कमल अली यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक माणूस संशयितरित्या या पुलावर फिरताना त्यांना आढळला. कमल अली यांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने सी लिंकवरून उडी मारली. अली यांनीही त्याच्यापाठोपाठ उडी घेतली मात्र लाटांचा जोर खूप असल्याने ते त्याला वाचवू शकले नाहीत. या अनोळखी तरूणाचा देह कोळीवाड्याजवळ सापडला असल्याचे वरळी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
