केप केनरवेल: मंगळावर रवाना करण्यात आलेले नासाचे सर्वात मोठे मार्स रोव्हर ‘क्युरिओसिटी’ हे यान मंगळावर उतरण्यापूर्वीच त्या ग्रहावर धुळीचे वादळ घोंघावत आहे. त्यामुळे यान उतरण्यास अडचण निर्माण झाली असली तरीही ही फार गंभीर समस्या नसल्याचा दावा नासाच्या संशोधकांनी केला आहे.
मंगळावरील माहिती जमा करण्यासाठी नासाने पाठविलेले रोव्हर हे यान दि. ६ ओगस्ट रोजी मंगळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र धुळीच्या वादळामुळे यान उतरण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
रोव्हर हे मोटारचाळीत वाहन असून ते मंगळाच्या पृष्ठभागावर चालत राहून नासाच्या मुख्यालयात माहिती पाठविणार आहे. धुळीच्या वादळामुळे माहिती जमा करण्यास या यानाला अडचण येण्याची शक्यता आहे. क्युरिओसिटी हे यान दोन वर्ष मंगळाच्या पृष्ठभागावर भ्रमण करून मंगळावरील खड्यांची माहिती गोळा करणार आहे. मंगळावर पाण्याचे अस्तित्व आहे किंवा नाही; याचाही शोध क्युरिओसिटी द्वारे घेतला जाणार आहे.
हे यान मंगळावर उतरताना या घटनेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून अमेरिकेतील टाईम्स स्वेअर येथे त्यासाठी महाकाय पडदा उभारण्यात आला आहे.