आपसातील कुरघोडीत सत्ताधार्यांचे राज्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष: जोशी

पुणे: सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपसात भांडणे आणि कुरघोड्या करण्यात मग्न असून त्यांना राज्याच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास वेळ नाही; अशी टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाँब्स्फोटनंतर पुण्याला भेट न दिल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.

जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांना जोशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अशोक हरणावळ, श्याम देशपांडे उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्यात बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित येथे येऊन अधिकार्यांना सूचना देणे आवश्यक होते. मात्र मुख्यमंत्री अजूनही इथे फिरकलेले नाहीत; अशी टीका करून जोशी म्हणाले की; आपण मुख्यमंत्री असताना लोक शिवसेनेला घाबरत असत. या सरकारला मात्र कोणीही घाबरत नाही. राज्याला कणखर नेतृत्वाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यातील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला नसल्याचे सांगणार्या पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचा त्यांनी निषेध केला. अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठी इस्त्रायलसारखे खमके धोरण स्वीकारावे लागेल असे सांगून जोशी यांनी ‘अफझल गुरूला अजून फाशी का होत नाही; असा सवालही केला.

Leave a Comment