पुणे: पुण्यात बुधवारी घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यात गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकातील अनुभवी कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पथकाला राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मार्गदर्शन करणार आहे.
पुण्यात बुधवारी घडविण्यात आलेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवादी शक्तींचे पूर्वनियोजित कृत्य असल्याची शक्यता सिंघल यांनी व्यक्त केली. स्फोटानंतर घटनास्थळी बॉम्ब सदृश दोन वस्तू सापडल्या असून त्याबाबत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याची पोलीस कसून चौकशी करीत असून त्याच्या कुटुंबियांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या स्फोटात वापरलेल्या दोन सायकली नवीन असून त्या कसबा पेठेतील एका दुकानातून खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या सायकल दुकानदाराकडेही पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
दरम्यान; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज पुण्याला भेट दिली. राज्यात गुन्हेगारी कारवाया वाढत असून त्याबाबत राज्यशासन काय कारवाई करीत आहे याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले कर्तृत्व सिद्ध करायचे असेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी; असे आव्हानही त्यांनी दिले.