लंडन ऑलिंपिक्स पैशांसाठी – हॉलेंड

लंडन दि.१ – फ्रान्सचे अध्यक्ष हॉलेंड यांनी लंडन ऑलिपिक्सच्या बहुतेक सामन्यांत स्टेडियममध्ये दिसणार्‍या रिकाम्या खुर्च्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्पोरेट सीटस ठेवायची गरजच काय असाही सवाल केला आहे. लंडन ऑलिंपिक्स पैसे मिळविण्यासाठी भरविले गेले नाही ना असेही ते म्हणाले. सोमवारी लंडनला आल्यानंतर त्यांनी ऑलिंपिक्स नगरीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. फ्रान्स ऑलिंपिक्सचे सामने भरवेल तेव्हा आमचे लक्ष पैशांपेक्षा गोल्ड मेडल्सकडे अधिक असेल असाही चिमटा त्यांनी यावेळी काढला.

लंडन ऑलिंपिक्स सामन्यात स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणार्‍या रिकाम्या खुर्च्या हा सर्वच प्रसारमाध्यमांनीही चर्चेचा विषय केला आहे. ही तिकीटे कार्पोरेट्सना जादा किमतीला विकली गेल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र कार्पोरेट क्षेत्र सामन्यांपासून दूरच राहिल्याने या खुर्च्या रिकाम्या पडत आहेत.

फ्रान्समध्ये २०२४ ला ऑलिंपिक्स सामने भरविण्यात येणार असून त्यासाठी अनेक शहरे उत्सुक आहेत असे हॉलेंड यांनी सांगितले. ते म्हणाले या काळापर्यंत मी फ्रान्सच्या अध्यक्षपदी असेन वा नसेन मात्र तरीही आमचे लक्ष्य पैसा नसेल तर सोन्याची मेडल्स हेच असेल. आत्ताही लंडनच्या तुलनेत फ्रान्स मेडल तक्त्यात वरच आहे. आमच्या अॅथलेटस साठी लंडनने जणू रेड कार्पेटच अंथरले आहे अशीही पुस्ती त्यांनी यावेळी बोलताना जोडली. मात्र अजून स्पर्धा सुरू असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही असेही ते म्हणाले.