गुजराथ हिमाचलमध्ये नोव्हेंबरला विधानसभा निवडणूका

नवी दिल्ली दि.१ – हिमाचल प्रदेश आणि गुजराथ राज्यातील विधानसभांच्या निवडणुका नोव्हेंबर २०१२ साली घेतल्या जाणार असल्याचे निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. हिमाचल मधील सर्वच पक्षांनी राज्यात एकाच दिवसात मतदान घेतले जावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती ती मागणी मान्य करण्यात आली असल्याचेही समजते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिमाचलमध्ये निवडणूका घेतल्या जाणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन किवा अधिक राज्यात निवडणुका होणार असतील तर मतदान पाठोपाठ घेतले जावे असे कलम आहे. त्यामुळे हिमाचल पाठोपाठ गुजराथ राज्यातही विधानसभेसाठी मतदान होईल.२००७ च्या निवडणूकांत गुजराथेत दोन फेजमध्ये ११ डिसेंबर आणि १६ ङिसेंबरला मतदान झाले होते. यावेळी नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात म्हणजे १३ नोव्हेंबरला येत असलेल्या दिवाळीनंतर कधीही मतदान घेतले जाईल असेही समजते.