शरद पवारांचा चार राज्यांचा दुष्काळ दौरा सुरू

नवी दिल्ली दि. १ – देशातील चार दुष्काळग्रस्त राज्यांच्या दौर्‍याला  केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी आज म्हणजे बुधवारपासून सुरवात केली. दुष्काळग्रस्त राज्यांची पाहणी करण्यासाठी येत असलेल्या पथकाचे नेतृत्त्व शरद पवार यांच्याकडे असून १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट या काळात हा दौरा केला जाणार आहे. सर्वप्रथम आज हे पथक महाराष्ट्राच्या भेटीवर येत असून दुपारी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली जाणार आहे. नंतर दुष्काळी भागाचा दौरा करून पावसाची तूट, पाणी टंचाई आणि पेरण्या यांचा आढावा घेतला जाणार आहे.

गुरूवारी हे पथक कर्नाटक राज्याला भेट देणार असून त्यानंतर शुक्रवारी गुजराथ आणि राजस्थान राज्यांना भेट देऊन तेथील दुष्काळाची पाहणी करणार आहे. त्यानंतर तेथील अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन चर्चा केली जाणार आहे असे समजते. केंद्राने यापूर्वीच दुष्काळग्रस्त राज्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केले असून दुष्काळग्रस्त राज्यातील शेतकर्‍यांसाठीही डिझेलमध्ये ५० टक्के सबसिडी जाहीर केली आहे.

एम्पावर्ड ग्रुप ऑफ मिनिस्टर्स, कृषी इन चार्ज यांनी दुष्काळग्रस्त राज्यांना १४४० कोटी रूपयांचे मदत पॅकेज देऊ केले असून हा पैसा या राज्यात दुष्काळावरचा उपाय असलेल्या जलसंधारण कामांसाठी वापरला जाणार आहे असेही सांगण्यात आले. यात महाराष्ट्राला ५०१ कोटी, राजस्थानला ४२४ कोटी, गुजराथला ३२० कोटी तर कर्नाटकला १९५ कोटी रूपये दिले जाणार आहेत.