नवी दिल्ली: महाराष्ट्रावरील अवर्षण आणि दुष्काळाचे संकट मोठे असून त्यावरील उपाययोजनांसाठी केंद्राकडून राज्याला एकून ७४६ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल; अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
केंद्राकडून राज्याला दुष्काळ निवारणार्थ ७४६ कोटीचा निधी
देशातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी मंगळवारी मंत्रिगटाची बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यात दुष्काळाला तोंड देण्यासाठी करण्याच्या विशेष प्रयत्नांची चर्चा झाली. याशिवाय कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागातही दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून एकूण ३०६ जिल्ह्यात अवर्षणाचे संकट आहे. मात्र देशात धान्याचा साठा पुरेसा असल्याने अन्न तुटवडा जाणवणार नाही; असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्याला २४६ कोटी रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आले असून आणखी ५०० कोटी देण्याची घोषणा पवार यांनी केली.
