मोरल पोलिसांच्या गुंडगिरीबद्दल केंद्राने कर्नाटकला खडसावले

मेंगलोर: मोरल पोलिसिंगच्या नावाखाली सुरू असलेली हिदुत्ववादी संघटनांची गुंडगिरी थांबवा; असे आदेश केंद्र शासनाने कर्नाटक शासनाला दिले आहेत.

मेंगलोर येथील खाजगी अतिथिगृहात असलेल्या काही युवक युवतींना हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मारहाण केली. त्या अतिथिगृहात रेव्ह पार्टी सुरू होती; असा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बंद पाळला.

या संदर्भात सरकारला कानपिचक्या देताना केंद्रीय माहिती, नभोवाणी मंत्री अंबिका सोनी म्हणाल्या की; अशा प्रकारच्या ‘स्वयंघोषित नैतिक पोलिसां’च्या गुंडगिरीवर त्वरित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा विकृत मनोवृत्तींना प्रोत्साहनच मिळेल. जर कोणी आपल्या घरात वाढदिवसानिमित्त किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी मेजवानी करीत असेल; आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर मजा करीत असेल तर त्याला आक्षेप घेता येणार नाही. भारतीय घटनेने कोणालाही इतरांच्या सन्मानाला ठेच पोहोचविण्याचा हक्क दिलेला नाही; असेही सोनी यांनी बजावले.

भाजपशासित कर्नाटकात मोरल पोलिसिंगच्या नावाखाली गुंडगिरी करण्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत असल्याने या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री जगदीश शेटटर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याबरोबर तातडीची बैठकही घेतली.