पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्यांकांचे जिणे हराम

वॉशिंगटन: पाकिस्तान मानवाधिकार परिषदेच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात दर महिन्याला अल्पसंख्य समाजातील २५ ते ३० युवतींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने धर्मांतरित केले जाते आणि अल्पसंख्य समाजातील व्यक्तींवर सतत धार्मिक हिंसा आणि सक्तीच्या धर्मांतराची टांगती तलवार असूनही त्यांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानचे सरकार काहीही पावले उचलत नाही.

हे निरीक्षण भारतातील कोणत्या हिंदुत्ववादी संस्थेचे नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने निरीक्षण आणि विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढले आहेत. पाकिस्तानातील एका दूरचित्रवाणी वाहिनीवरून रिअलिटी शो च्या नावाखाली एका युवकाच्या धर्मांतराचे ‘लाईव्ह’ प्रसारण करण्यात आले. त्यावरून जगभर खळबळ माजली. मात्र पाकिस्तानात आणि बांगलादेशातही अल्पसंख्यांकांचे जबरदस्तीने धर्मांतर ही सर्रास चालणारी बाब आहे; हेच अमेरिकेच्या या अहवालावरून स्पष्ट होते. आपल्या निष्कर्षांना पुष्टी देणारी अनेक उदाहरणेही या अहवालात देण्यात आली आहेत.

धार्मिक अत्याचारांच्या बाबतीत बांगलादेशही मागे नाही. बांगलादेशातही हिंदू, इसाई आणि बौद्धधर्मीयांची हिंसा केली जाते. सक्तीने धर्मांतर केले जाते. याशिवाय त्या देशातील अल्पसंख्यांकांच्या जमिनी हडप करण्यासाठी सरकारने एक कायदाच केला आहे. या कायद्यान्वये बांगला सरकारने अल्पसंख्यांकांची तब्बल २६ लाख एकर जमीन हडपली आहे; असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.