म.गांधीवरील पुस्तकाचा चिनी भाषेत अनुवाद

बिजिंग दि.३१ – दहशतवाद आणि हिंसाचाराने पोळत असलेल्या जगाला शांततेची आस लागली असतानाच कम्युनिस्ट चीनला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आपलेसे वाटू लागले आहेत. ज्येष्ठ भारतीय मुत्सदी पास्कल अॅलन नझारेथ यांनी लिहिलेल्या म.गांधी – आऊटस्टँडिग लिडरशीप क्वालिटीज या पुस्तकाचा मँडरीन भाषेत अनुवाद करण्यात आला असून ही आवृत्ती चीनमध्येच प्रकाशित केली जाणार आहे असे समजते.

चीनी बुद्धिवंतांच्या नव्या पिढीवरचा माओच्या क्रांतीकारी विचारांचा  प्रभाव ओसरत चालला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच ही पिढी गांधीविचारांकडे अधिक आकर्षित होत चालल्याचा अनुभवही येत आहे.  गांधी विचारसरणीबाबत त्यांच्यात औत्सुक्य आहे. यामुळेच या पुस्तकाचे चीनी भाषेत भाषांतर करण्यात आले असून त्यासंबंधीचा करार भारतीय राजदूत एस जयशंकर आणि कमर्शियल प्रेस चायनाचे सीईओ यु डियान्ली यांच्यात सोमवारी बिजिंग येथेच करण्यात आला आहे.

नझारेथ यांचे हे पुस्तक २००६ सालीच प्रकाशित झाले असून अनेक भारतीय भाषांबरोबरच त्याचा स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेतही अनुवाद करण्यात आला आहे. मँडरीन या चीनी भाषेत अनुवादित होत असलेले गांधीवरचे हे दुसरे पुस्तक आहे. पुढच्या वर्षात ते चीनच्या बाजारात उपलब्ध होईल. अमेरिकन लेखक विल्यम श्रिरर यांच्या गांधीच मेमोरीच या पुस्तकाचा चीनी अनुवाद नुकताच चीनी बाजारात आला आहे. नझारेथ यांच्या पुस्तकात गांधीनी देशाच्या नेतेपदाची भूमिका बजावताना प्रगती, आधुनिकीकरण आणि पाश्चात्यीकरण यांच्यात कसा मेळ घातला होता याचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय नेता म्हणून त्यांना कशी मान्यता मिळत गेली आणि त्यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांमधील ताकदही दाखविण्यात आली आहे.

द.चीनच्या नॉर्मल विद्यापीठातील प्राध्यापक शांग क्यूंक यांनी हा अनुवाद केला असून त्यांनी गांधी आणि नेहरू यांच्यावर पी.एचडी मिळविली आहे. त्यांनी अनेकदा भारताला भेटही दिली आहे. आपली तत्त्वे आणि आदर्श यांना आव्हान दिले गेले तर मवाळ स्वभावाचा हा नेता प्रसंगी किती कठोर होऊ शकत असे हे खरोखर अभ्यासण्यासारखेच असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले की माओ आणि गांधी यांनी आपापल्या देशात चळवळी चालविल्या आणि आदर्श निर्माण केले आहेत. तरीही गांधींच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांकडे युवा चीनी पिढी आकर्षिली जात आहे असे दिसून येत आहे. व त्यामुळेच या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे ठरविले आणि हे पुस्तक चीनमध्ये प्रचंड खपेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.