सीमा सुरक्षेसाठी भारतीय सुरक्षा दल करणार इस्त्राईलच्या तंत्राचा अभ्यास

जेरुसलेम: २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून भारत आपली सीमा सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्त्राईलच्या सीमा सुरक्षा तंत्राचा अभ्यास करण्याची इच्छा भारताने व्यक्त केली असून त्याला इस्त्राईलने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्या दृष्टीने भारताचे एक प्रतिनिधी मंडळ पुढच्या महिन्यात इस्रायलमध्ये दाखल होत असून हे मंडळ गाझा पट्टी, पश्चिम किनारे आणि मिस्रच्या सीमेवर इस्त्राईलच्या सुरक्षा दलाकडून सुरक्षा तंत्राबाबत माहिती घेणार आहे.

इस्राईल दहशतवादी घटनांवर काबू ठेवण्यासाठी मिस्रच्या सीमेवर कुंपण घालत आहे. त्यामुळे इस्राईल मधील घुसखोरी आटोक्यात येईल. इस्राईलच्या संरक्षण खात्याने आतापर्यंत १५० किलोमीटरचे कुंपण घातले आहे. हे काम वर्ष अखेरीस संपलेले असेल. कुंपणाची उंची ५ मीटर असून त्यावर काटेरी तार लावलेली आहे. सीमेवर बारा रडारही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक किलोमीटरवरून घुसखोरी होत असल्याची नुसती शंका आली तरी ती सूचना त्वरित मिळू शकेल.

अमेरिकेचा आंतरिक सुरक्षा विभागही इस्रायलच्या या प्रयोगातील ‘ईएलएम २११२’ रडारप्रणालीची माहिती घेत आहे. या यंत्रणेतील वेगवेगळ्या क्षमतेची रडार ३०० मीटर पासून २० किलो मीटरपर्यंतच्या परिसरात नजर ठेऊ शकतात. याशिवाय ४० किमी दूरवर असलेल्या वाहनाचा शोध हे रडार घेऊ शकते.

भारत या अभ्यासाचा उपयोग पाकिस्तान व बांगलादेश सीमेवर सुरक्षा यंत्रणा प्रभावी करण्यासाठी करण्यासाठी करणार आहे.