तिवारी हेच रोहितचे जन्मदाते

नवी दिल्ली: वयाच्या ८७व्या वर्षी बाप बनण्याची ‘नामुष्की’ पदरात पडल्याने कॉंग्रेसचे नेते एन. डी. तिवारी यांना कपाळाला हात लावण्याची पाली आली आहे. रोहित शेखर या ३२ वर्षीय तरुणाचे पितृत्व तिवारी यांच्याच पदरात असल्याचे डी.एन.ए.चाचणीवरून सिद्ध झाले आहे.

नारायण दत्त तिवारी हे आपले पिता असल्याचे सांगत रोहितने २००८ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या डी.एन.ए. तपासणीचे आदेशही दिले. मात्र तिवारी यांनी आपले आपली तपासणी करण्यास नकार दिला. न्यायालयानेही त्यांची बाजू उचलून धरत त्यांना सक्ती करता येणार नाही असे मत व्यक्त केले. रोहितने या निर्णयाला द्वी सदस्यीय खंडपीठाकडे आव्हान दिले.

तिवारी यांची तपासणी झाल्याखेरीज आपल्याला न्याय मिळणार नाही असा युक्तिवाद त्याने केला. तो ग्राह्य मानून न्यायालयाने तिवारी यांची डी.एन.ए. तपासणी करून घेतली आणि ते रोहितचे पिता असल्याचे उघड झाले आहे.