यार्डलेचे विप्रोकडून अधिग्रहण

लंडन दि.२६- लंडनची सर्वात जुनी आणि जगभरात प्रसिद्ध असलेली परफ्यूम्स आणि स्प्रे बनविणारी यार्डले कंपनी विप्रो कंझ्युमर केअर कंपनीने विकत घेतली आहे. त्यासाठी किती रक्कम विप्रोने मोजली हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.

यार्डले ही कंपनी १७७० साली स्थापन झालेली जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीने आजपर्यंत आपल्या उत्पादनांचा दर्जा सातत्याने उत्तम राखला असून त्यामुळे जगभरात या कंपनीची विश्वासार्हता आहे. या कंपनीचा विंडसर वुडस हा ब्रँड जगभरातील परफ्यूम प्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली ओळख विप्रोच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे विप्रो कंझ्युमर कंपनीचे संचालक नागेंद्र आर्य यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की यार्डलेचे ब्रँडनेम कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र यार्डले घेतल्यामुळे आता आमच्या कंपनीचा विस्तार आशिया, युरोप, मध्य आशिया, द.आफ्रिका, ऑस्ट्रेलियातही करता येणार आहे. आमची नवी उत्पादनेही याच ब्रँडने बाजारात आणली जाणार आहेत. यार्डले घेतल्यामुळे कंपनीच्या महसुल १८४.९ कोटी रूपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.

यार्डले आणि विप्रोतर्फे करारावर नुकत्याच स्वाक्षर्‍या करण्यात आल्याचेही आर्य यांनी सांगितले.