लॉस एंजलिस दि.२६ – सार्या जगावर आपल्या आवाजाची मोहिनी घालणारा आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेला गायक मायकेल जॅक्सन याच्या तीन मुलांसाठी नवीन पालक नेमण्यात आला असून बुधवारी लॉस एंजेलिस सुपेरियर कोर्टाचे जज बेक्लॉफ यांनी या संदर्भातला निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार मायकेलच्या मोठ्या भावाचा मुलगा टिटो जॅक्सन ज्युनिअर वय ३४ याच्याकडे मायकेलच्या प्रिन्स मायकेल, पॅरीस आणि ब्लँकेट या मुलांचा ताबा देण्यात येणार आहे.
मायकेलच्या मृत्यूनंतर त्यांच्या इस्टेटीवरून या घराण्यात वाद सुरू झाले आहेत. मायकेलची आई ८२ वर्षीय कॅथरीन हिच्याकडे या मुलांचे पालकत्व होते. मात्र आठवड्यापूर्वी ती अचानक गायब झाल्याचे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली होती. तिच्या प्रकृतीबाबत मायकेलची मुलगी पॅरीस हिने चिंता व्यक्त केली होती व आजी गायब झाल्याची तक्रारही नोंदविली होती. त्यानंतर मायकेलच्या बहिणीच्या घरी ओरेझोना येथे कॅथरिन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. टीटो जॅक्सनने मंगळवारी कॅथरीनशी त्याचे फोनवरून बोलणे झाले असल्याचे न्यायालयात सांगितले मात्र त्याचवेळी कॅथरिन नेहमीसारखी बोलत नव्हती. ती फारच कोड्यात आणि कांही कळणार नाही अशा पद्धतीने बोलत असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्यानंतर मायकेलच्या मुलांचे पालकत्व टीटोला देण्यात आले.
मायकेलची बहिण गायिका जेनेट जॅक्सन हिने मायकेलने त्याची सर्व संपत्ती तिच्या व तिच्या मुलांच्या नांवे करून दिल्याचे मृत्यूपत्र सादर केले असून या पत्रावरची सही मायकेलची नाही व ज्या तारखेला ही सही करण्यात आली तेव्हा मायकेल कॅलिफोर्नियात नव्हताच असा खुलासा त्याची मुलगी पॅरिस हिने केला आहे. मायकेलची सही फोर्ज करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे .मायकेलच्या मृत्यूपासून म्हणजे जून २००९ पासून त्याच्या मालमत्तेतून आत्तापर्यंत ४७५ दशलक्ष डॉलर्सचा निव्वळ नफा मिळाला असल्याचेही समजते.