नवी दिल्ली: टीम अण्णाने लोकपालाच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे बुधवारपासून सुरू केलेल्या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे गुरुवारीही दिसून आले. स्वत: अण्णांनी उपोषणात सहभागी होण्याबाबत घातलेला घोळ या उदासीनतेला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जंतर मंतरवर गर्दी जमली असली तरीही अपेक्षेएवढ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी गुरुवारी आंदोलकांच्या संख्येत वाढ होईल अशी संयोजकांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे हे आंदोलनाचे मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर झालेल्या आंदोलनाप्रमाणे हसे तर होणार नाही ना; ही शंका संयोजकांना भेडसावत आहे.
वास्तविक अण्णा हजारे हाच या आंदोलनाचा चेहेरा असून टीम अण्णातील इतरांना व्यापक जनाधार नाही. या आंदोलनात आपण उपोषण करणार असल्याचे अण्णांनी आंदोलन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सांगितले. प्रत्यक्षात उपोषण न करता ते केवळ आंदोलन स्थळी उपस्थित राहिले. योग गुरू रामदेवबाबा हे देखील उपोषणात सहभागी होणार होते; मात्र ते ही घडले नाही. त्यामुळे जनता या आंदोलनाबाबत उदासीन असून संयोजक आंदोलनाच्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत.