दहशतवादाविरुद्ध लढा हे चौथे महायुद्धच: प्रणब मुखर्जी

नवी दिल्ली: दहशतवादाने सर्व जगाला विळखा घातला असून भारतासह अनेक देश दहशतवादाचा मुकाबला करीत आहेत. त्याविरुद्धच्या युद्धाची व्याप्ती चौथ्या जागतिक महायुद्धाएवढीच आहे; असे मत भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.

मुखर्जी यांनी बुधवारी राष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. एस.एच. कापडिया यांनी त्यांना शपथ दिली.संसदेच्या सेन्ट्रल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित होते.सीमेवर आणि देशांतर्गत लढाई लढणारे जवान आणि पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगून राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाले की; युद्धाचे दिवस अजून संपलेले नाहीत. जगाला दहशतवादाच्या परिणामांची ओळख होण्यापूर्वीपासून भारताने त्याची झळ सोसली आहे.

देशातील प्रगतीची फळे मूठभर लोकांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता व्यक्त करून प्रणबदा पुढे म्हणाले की शिक्षण देशात सुवर्णयुग आणू शकते. त्यासाठी शिक्षणाचा सर्वदूर प्रसार होणे आवश्यक आहे.