
सध्या जगातच कॉर्पोरेट क्षेत्राला अनेक फाटे फुटायला लागले असून, त्यातून नवनवे उपक्रम सुरू होत आहेत. कारखानादारांनी केवळ पैसा कमावता कामा नये, त्यांना ज्या समाजातून पैसा मिळत असतो त्या समाजालाही काही तरी दिले पाहिजे. असा विचार पुढे आला आहे. जगातला सर्वात श्रीमंत मानला जाणारा बिल गेटस् या बाबत आदर्श काम करीत आहे. तो आपला पैसा समाजाच्या कामासाठीच खर्च करीत आहे. आता प्रत्येकच उद्योगपती असा विचार करीत आहे. प्रत्येकच व्यवसायाचे स्वरूप वेगळे आहे. त्यांचा सामाजिक आधार वेगळा आहे. त्यामुळे त्यांना त्यांना करावे लागणारे कामही वेगळे असणार आहे. त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी असे म्हटले जाते. तशा प्रत्येक उद्योग संघाचा जनसंपर्क विभाग असतोच पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचे स्वरूप वेगळे असते. या कामात लोकांसाठी शिक्षण संस्था काढण्यापासून ते त्यांना घरे बांधून देण्यापर्यंतच्या कामाचा अंतर्भाव आहे. कामाचे स्वरूप व्यापक झाले की त्याचे प्रशिक्षण कोणी तरी घेतले पाहिजे आणि त्या कामाच्या स्वरूपाची पूर्ण माहिती असलेले लोक उपलब्ध झाले पाहिजेत अशी गरज निर्माण होते. त्यातून ते ते स्वतंत्र अभ्यासक्रम आपोआपच सुरू होतात.
