बाजारनियंत्रित अर्थव्यवस्थेमुळे बड्या कंपन्या देशाला बोटावर नाचवतील: पारीख

वडोदरा: पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बाजारनियंत्रित अर्थनीतीमुळे देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्या एकत्र येऊन संपूर्ण व्यवस्थेला आपल्या बोटावर नाचवू शकतील; अशी भीती इंग्लंडचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड भिक्खू पारीख यांनी व्यक्त केली. महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहेरू यांच्या आर्थिक धोरणावरही त्यांनी टीका केली.

रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. आय. जी. पटेल यांनी लिहिलेल्या ‘इकॉनॉमिक्स, पॉलिसी अँड डेव्हलपमेंट : अ‍ॅन इण्टलॅक्चुअल जर्नी’ या पुस्तकाचे प्रकाशन पारीख यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पारीख यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक धोरणाबाबत चिंता व्यक्त केली.

बाजारपेठीय अर्थव्यवस्थेतून आर्थिक, सामाजिक समस्यांना उत्तर शोधणे हे केवळ क्रयशक्ती मोठी असलेल्याना फायद्याचे ठरते. अशा धोरणांचा अंगीकार केला तर चार कॉर्पोरेट घराणी एकत्र येऊन देशावर राज्य करतील असा इशारा पारीख यांनी दिला.

स्वातंत्र्योत्तर काळात पं. नेहेरू यांनी सरकारचे वर्चस्व असणारी धोरणे राबविली. या धोरणामुळे सर्व सूत्रे सरकार आणि शासकीय यंत्रणांच्या हातात एकवटून उद्यमशीलतेचा गळा घोटला जातो. मात्र सध्याच्या काळात कोणत्याही समस्येवरील उपायासाठी बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची अर्थनीती अवलंबिण्यात येत आहे; असे पारीख यांनी सांगितले.

महात्मा गांधींचा भर अधिकाराचे विकेंद्रीकरण करून नागरी संघटना बळकट करण्यावर होता. सध्याच्या नागरी संघटनांच्या आंदोलनांच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र नागरी संघटनांचे नेतृत्व समाजातील मध्यमवर्गाकडेच असते. त्यामुळे इतर वर्गांची उपेक्षा होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नागरी संघटनांमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुसूत्रता आणि एकवाक्यता नसल्याने हे धोरण फुटीरतावादाला खतपाणी घालणारे ठरू शकते; असेही पारीख यांनी निदर्शनास आणून दिले.

केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ग्रामीण रोजगार योजनेवरही त्यांनी टीका केली. या योजनेतून गरिबांना आधारही मिळत नाही आणि लोकोपयोगी कामेही होत नाहीत; असा आक्षेप पारीख यांनी घेतला.

Leave a Comment