अमेरिकेच्या पहिल्या महिला अंतराळवीर स्याली राईड कालवश

लॉस एंजिल्स: अवकाशात झेप घेणारी पहिली अमेरिकन महिला स्याली राईड यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. स्पेस शटल चालेन्जर एसटीएस-७ या मोहिमेवर त्यांनी सन १९८३ मध्ये इतिहास रचला. अंतराळवीर स्यालीच्या आधी सन १९६३ मध्ये वालेन्तिना तेरेश्कोवा तर १९८२ ला स्वेतलाना सावित्स्काया या रशियन महिला अवकाश मोहिमेवर गेल्या होत्या. स्याली १९८४ ला पुन्हा एकदा अवकाश मोहिमेवर गेल्या त्या एसटीएस -४१ जी च्या सदस्या म्हणून! त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ३४३ तास अवकाशात घालविले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी त्या १७ महिने झुंज देत होत्या.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, नासाचे संचालक चार्ल्स बोल्दन, उपसंचालक लोरी गारव्हर, तसेच अवकाश शास्त्रज्ञ, इतिहास तज्ञ ,व अनेक विद्वानांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. स्याली अनेक महिलांना व्यक्तिगत व व्यावसाईक रोल मोडेल म्हणून आवडत. त्यांच्यातील चैतन्य व त्यांचा करारीपणा जगभरातल्या सर्व महिलांना प्रेरणा देणारा होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्या प्रचंड इच्छाशक्तीने, आवडीने, उत्सुकतेने व बांधिलकीने जगल्या. त्यांचा वाखाणण्यासारखा प्रामाणिकपणा आणि निर्भयपणे जीवन जगण्याचा दृष्टीकोन सर्वांनाच प्रेरणा देणारा होता.