
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत केलेल्या काही भाषणांत आपल्या संस्कृतीची महती सांगताना, भारतीय संस्कृतीत महिलांकडे सन्मानाने पाहिले जाते असे म्हटले होते. पाश्चात्त्य लोक बाईकडे बाई म्हणून पाहतात आणि आम्ही बाईकडे आई म्हणून पाहत असतो अशी तुलना त्यांनी केली होती. स्वामीजींच्या काळात काही तरी वेगळी स्थिती असेल पण आता अशी तुलना करण्याची हिंमत कोणी करणार नाही. कारण स्थिती फार बदलली आहे. नेमकेपणाने सांगायचे तर ती बिघडली आहे. पाश्चात्त्य लोक बाईकडे बाई म्हणून पहात असले तरी ते बाई म्हणून तिचा सन्मान करत असतात पण आपण भारतीय मात्र स्त्रीकडे आई म्हणून पहातो असे तोंडाने केवळ म्हणून ढोंग करीत आहोत आणि स्त्रीची अधिकात अधिक विटंबना करण्यात पुरुषार्थ मानायला लागलो आहोत.काल राजस्थानात काही लोकांनी गावातल्या एका स्त्रीला झाडाला बांधून झोडपून काढले. तिचा शेजारच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा त्यांचा संशय होता. त्या तरुणालाही त्यांनी तिच्यासोबत मारहाण केली. मारहाण करण्यापूर्वी त्यांचे मुंडण केले आणि त्यांचे कपडे फाडले. आपल्या देशातले काही लोक स्त्रीच्या बाबतीत किती निर्दयपणा करायला लागले आहोत याचे हे एक उदाहरण आहे.
आता कोणाच्याही मनात असा प्रश्न निर्माण होईल की एका विवाहितेने आपल्या पतीच्या माघारी दुसर्या पुरुषाशी असा संबंध ठेवावा का? याचे उत्तर नाही असेच असेल पण म्हणून त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार गावातल्या टवाळांना कोणी दिला? या बाईचा नवरा अनेक दिवसांपासून गुजरातेत कामाला आहे. पती आणि पत्नी यात दुरावा आहे. पतीचा विरह सहन न झाल्यामुळे त्या बाईचा पाय घसरला. आपल्या समाजातले वातावरण असा पाय घसरण्यास अनुकूल आहे. त्या बाईचा पाय घसरला पण असे पुरुषांचे पाय घसरत नाहीत का? मुंबई, पुणे, सूरत, मिरज, कोलकत्ता या शहरांत हजारो महिला वेश्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. या वेश्या कोणाच्या देहाची भूक भागवत असतात याचा शोध घेतल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, ज्या लोकांना गावात काम मिळत नाही म्हणून कामासाठी मोठे गाव गाठावे लागते ते लोक आपल्या बायकांपासून दूर असतात. त्यांची शरीरं पेटलेली असतात. ती थंड करण्याचे काम या वेश्या करीत असतात.
अशा पुरुषाने आपले शरीर थंड करण्यासाठी परस्त्रीला जवळ केले तर आपला समाज त्याला अपराधी समजत नाही. पण अशा स्त्रीचा याच भुकेपायी पाय घसरला, तर मात्र तिला अपराध समजतो. तिला मात्र शिक्षा केली पाहिजे आणि वेश्यांचे उंबरठे झिजवणार्या पुरुषांना मात्र सोडले पाहिजे असे हे ढोंगी न्यायदान आहे. गावात नवर्यापासून दूर राहणार्या अनेक महिला असतात आणि त्यांचा माग काढणारे अनेक गावगुंड असतात. त्यातल्या ज्यांच्या हातात या महिला सापडत नाहीत ते गावगुंड चिडून असे न्यायदान करीत असतात. येशू ख्रिस्ताची एक गोष्ट सांगतात. अशाच एका व्यभिचारी बाईला गावातले लोक पकडतात. तिला सर्वांना दगड मारावेत असा आदेश गावचा मुखिया सोडतो. ती बाई आश्रयाला ख्रिस्ताकडे येते. तेव्हा येशू ख्रिस्त त्या गर्दीला सामोरे जातात. सर्वांनी उद्देशून ते म्हणतात, ‘या बाईला तिच्या पापाबद्दल दगड मारायला काही हरकत नाही कारण, ती पापी आहे. पण तिला दगड मारायचा अधिकार अशा माणसालाच आहे ज्याने आजवर कधी पाप केलेले नाही.’ त्यांचे हे आवाहन ऐकल्यावर त्या बाईकडे एकही दगड येत नाही. राजस्थानात त्या स्त्रीला झाडाला बांधून मारणार्यांना असेच आवाहन केले असते, तर तिला मारायला एकही हरीचा लाल पुढे आला नसता. कारण आपल्या समाजात विवाहबाह्य संबंधांचे जाळे फारच पसरलेले आहे.
भारतात एड्स प्रसार सुरू असतानाच्या काळात हा विकार भारतात होणारच नाही असे काही लोक छाती ठोकपणे सांगत होते कारण भारतीयांत विवाहबाह्य संबंध नाहीत अशी त्यांची खात्री होती.
पण भारतातच हा विकार मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळले. तो अमेरिकेतून भारतात आला. अमेरिकेत गेलेले काही भारतीय लोक अमेरिकेतल्या वेश्यांकडे गेले आणि त्यांनी हा प्रकार भारतात आणला. तिथून तो भारतभर पसरला. तो स्त्री-पुरुष संबंधातून पसरतो. मग अमेरिकेतून भारतात आलेल्या एका माणसापासून हा प्रकार देशभरात पसरतो याचा अर्थ विवाहबाह्य संबंधांची तेवढी मोठी साखळी या देशात आहे. ती काय केवळ बायकांनी निर्माण केली आहे का? तिच्यात पुरुषांचाही मोठा हिस्सा आहेच ना? मग राजस्थानातले ते स्वघोषित संस्कृती संरक्षक यातल्या किती पुरुषांना झाडाला बांधून मारहाण करणार आहेत? एखादी गरीब बाई पाहून हात धुवून घेण्यात शौर्य मानणार्या या नरपुंगवांनी आधी आपले चारित्र्य तपासून पहावे आणि ते चांगले असेल तर देशभरातल्या अनैतिक स्त्री-पुरुष संबंधांचा समाचार घ्यावा. गावात नैतिकता आणल्याचा खोटा आव आणून उड्या मारण्यात काय अर्थ?