
शरदराव पवार यांचा संपुआघाडीत बंड करण्यामागे नेमका काय हेतू आहे, यावर महाराष्ट्रातले राजकीय विश्लेषक चर्चा करून थकले आहेत. पण त्यातल्या कोणाला तरी पवारांचे हे बंड नेमके कशासाठी आहे याचा पत्ता लागला आहे की नाही असा प्रश्न पडतो. कारण पवारांचे राजकारण फार गहन असते. फसवे असते आणि अनेकांना चकवणारेही असते. पवारांनी मंत्रिमंडळातल्या क्रमांक दोनवर दावा सांगण्यासाठी, प्रफुल्ल पटेल यांना अधिक प्रभावी खाते मिळावे यासाठी, तसेच सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदासाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी हा सारा प्रकार केला आहे असे म्हटले जात आहे. तसे विश्लेषणही करण्यात येत आहे. काही लोकांच्या मते पवारांचा या गडबडीमागे महाराष्ट्रात सत्तापालट घडवण्याचाही हेतू आहे. त्यांनी राजीनाम्याची आवई उठवल्यानंतर दोन दिवसांनी तसा मुद्दा उपस्थितही केला आहे. महाराष्ट्रात सरकार काम करीत नाही, मुख्यमंत्र्यांना ठाकरे बंधूंच्या पी.ए.ला भेटायला सवड आहे पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायल वेळ नाही, राष्ट्रवादीची कामे होत नाहीत असा पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या गार्हाण्यांचा पाढा वाचला आहे. हे सगळे सुरू असतानाच अजित पवारांनीही महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या सोबत राहण्यात काही अर्थ नाही असे म्हणून कळस केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केन्द्रातल्या आघाडीतून बाहेर पडायचे ठरवले तर केन्द्रातले सरकार काही कोसळणार नाही पण त्याचा परिणाम होऊन राज्यातले सरकार नक्कीच कोसळेल. या कोसळण्या मागची कारणे खरी कोणती आणि दाखवायची कोणती याचा तपास नंतर करता येईल पण राष्ट्रवादीची विधानसभेतली आमदारांची संख्या निर्णायक असल्यामुळे त्यांनी सरकारचा आधार काढून घेताच ते सरकार नक्कीच पडणार आहे.
