मुंबई: आयकर विभागाच्या नावाने बनावट इमेल पाठवून बँक खात्याचा तपशील मिळवायचा आणि त्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आयकराचा परतावा मिळविण्यासाठी माहिती मागणारा इमेल आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये; असा इशारा आयकर विभागाने दिला आहे.
आयकर विभागाच्या बनावट आयडीवरून इमेल करून काही भामटे दहा दिवसात आयकर परतावा मिळेल अशी लालूच दाखवितात. त्यासाठी बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड, डेबिट कार्ड क्रमांक, पिन क्रमांक ही माहिती मागितली जाते. एखाद्या व्यक्तीने परताव्याच्या आमिषाला भुलून ही माहिती दिली की त्याच्या खात्यातून रक्कम काढली जाते.या बनावट इमेलपासून लोकांनी सावध राहावे आणि कोणतीही माहिती इमेलवरून देऊ नये; असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.