पवारांच्या दबावामुळे मुख्यमंत्री धरणार दिल्लीची वाट

नवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दबाव नात्याचे फलित म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा दिल्लीची वाट धरावी लागण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबरच खुद्द काँग्रेसच्या निम्म्याहून अधिक आमदारांनी पृथ्वीराजबाबांच्या विरोधात दिल्लीश्वरांचे कान फुंकले आहेत. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार पाठीशी घालण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत. त्याचबरोबर उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांच्याबाबत चव्हाण यांच्या काटेकोर भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या मनात मुख्यामान्त्र्यान्बद्दल आढी आहे; हे उघड गुपित आहे. ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणी साफ सफ़ाईचा झाडू हाती घेऊन आलेले पृथ्वीराजबाबा फक्त कायद्याची कामे करतात. फायद्याची नाही. त्यामुळे स्वपक्षीय हितसंबंधी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची नाराजीही त्यांनी ओढवून घेतली आहे. त्यांच्याच पक्षाच्या ६२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत दिल्लीत तक्रारी केल्या आहेत.

चव्हाण यांची व्यक्तिगत प्रतिमा स्वच्छ आहे आणि त्यांच्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वावर पक्षश्रेष्ठीचा विश्वास असला तरीही देशात आणि राज्यात आघाडी सरकार चालविताना पवारांसारख्या नेत्याला दुखावून चालण्यासारखे नसल्याने चव्हाण यांची केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यावर वर्णी लाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पवारांच्या पसंतीचा उमेदवार बसविला जाण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment