सोलापूर: सोलापूर जवळ कर्नाटक सीमेवरील मंद्रूप या गावाजवळ असलेल्या जंगलात अल्पवयीन मुलींच्या विक्रीचे रेकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत ९ बांग्लादेशी मुलींची सुटका करून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी जेरबंद
मंद्रूप जवळच्या जंगलात बंगला देशातून नोकरीच्या आमिषाने आणलेल्या मुलींची वेश्या व्यवसायासाठी विक्री होत असल्याची माहिती पुण्याच्या रेस्क्यू फौंडेशन या संस्थेला मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या मुलींची सुटका केली. बंगला देशातील अल्पवयीन मुलींना कपडे शिवण्याच्या कारखान्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले जात असे.
प्रत्यक्षात त्यांना ४० हजार रुपयात खरेदी करून वेश्या व्यवसायासाठी दोन लाख रुपयांना विक्री केली जाते. या मुलींनी प्रतिकार केल्यास त्यांना सिगारेटचे चटके देणे अथवा धारदार शस्त्राने अंगभर जखमा करणे; असे प्रकार केले जात असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मुलींच्या तस्करीची आंतरराष्ट्रीय टोळी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
