अमेरिकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी कोलोरॅडो राज्यातील अरोरा शहरात बॅटमॅन या चित्रपट सुरू असताना थिएटरमध्येच गोळीबार करून १२ जणांचा जीव घेणार्या कृत्याचे सैतानाचे कृत्य असे वर्णन केले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या प्रेक्षकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ओबामांनी या शहराला सोमवारी भेट दिली. मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी जखमी लोकांना दाखल करण्यात आलेल्या रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की गेल्या दोन दिवसांत या हल्लेखोरांने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. याचा न्यायनिवाडा लवकरच केला जाईल आणि जग हे चांगल्या लोकांचेच आहे यावर लोकांचा पुन्हा विश्वास बसेल अशी मला आशा आहे. मी येथे अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने आलेलो नाही. मीही कुणाचा पिता आहे, कुणाचा नवरा आहे, कुणाचा मित्र आहे. त्यामुळे या भीषण घटनेत मरण पावलेल्या तसेच जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांचे दुःख मी जाणू शकतो. या लोकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत कारण ही परिस्थितीच फार भीषण आहे.
मी येथे या लोकांच्या भेटीला सर्व जनतेचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. देशातील सर्व जनतेच्या भावना मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. सर्व देशबांधवांच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छीतो की दररोज तुमचाच विचार आमच्या मनात येतो आहे. तुमच्या दुःखात तुम्हाला थोडा दिलासा मिळावा आणि तुम्हाला दुःखाचा लवकरात लवकर विसर पडावा अशीच प्रार्थना आम्ही सर्वजण तुमच्यासाठी करत आहोत.