भारतीय हॉकी संघाला दुखापतींची डोकेदुखी

लंडन: अनुभवी बचावात्मक खेळाडू इग्नेस टिर्की याच्या गुडघ्यातील चमक आणी स्टार मिड फिल्डर सरदारा सिंग याला झालेली पायाची दुखापत यामुळे हॉकीच्या भारतीय ऑलिम्पिक संघाची डोकेदुखी वाढली आहे.

भारतीय हॉकी संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सरदारा आणि इग्नेस यांना स्पेन येथील सराव सामन्यात दुखापत झाल्याने ते आठवडाभर सराव करू शकले नाहीत. सरदाराने वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नानंतर शनिवारी प्रशिक्षण घेतले.

या दोन्ही खेळाडूंच्या जखमी असण्याने भारतीय हॉकी संघ चिंतीत असल्याचे संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी सांगितले. सरदारा सावरणे ही संघाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली तरी इग्नेस पुन्हा सक्षम होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.