भारताशी लष्करी सहकार्याबाबत अमेरिकेतील पक्षांमध्ये एकमत

वॉशिंगटन: भारतीय सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा विचार करता भारत हा अमेरिकन लष्करी तंत्रज्ञान विकसनात आणि धोरणात्मक बाबीत अमेरिकेचा महत्वाचा भागीदार ठरू शकतो. जगातील या दोन मोठ्या लोकशाही शक्ती जगात स्वातंत्र्य, सुरक्षा आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी महत्वाचा सहभाग देऊ शकतात असा विश्वास अमेरिकन संसद सदस्यांनी पेन्टागॉनला दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे संरक्षण उपसचिव ईश्टन कार्टर हे पुढील आठवड्यात भारताला भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकन संसद सदस्यांनी भारत विषयक समितीचे सदस्य जॉन कोर्निन आणि मार्क वोर्नर यांनी त्यांना भारताशी लष्करी सहयोगाचे महत्व विषद करणारे पत्र पाठविले आहे. भारताने सन २०१५ पर्यंत लष्करी दलांचे अत्याधुनिकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी सुमारे ८० कोटी डॉलर्स एवढा निधी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबरोबर लष्करी साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या व्यापारात वृद्धी करणे आणि एकमेकांच्या सहकार्यातून शस्त्रास्त्र विकसन; उत्पादनाचे प्रकल्प उभारणे हे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय आणि अमेरिकन सैन्य दलांनी एकत्र सराव करणेही दोन्ही दलांना अधिक बलशाली बनवेल; असा विश्वासही या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

भारताशी लष्करी सहकार्याबाबत अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेट या दोन्ही पक्षांचे एकमत असल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे. हे पत्र लिहिणारे कोर्निन हे रिपब्लिकन तर वोर्नर हे डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत.