नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दीडशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. या आरोपामुळे महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यास राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नकार दिल्याने हा समारंभ वादाच्या भोवर्यात अडकला आहे.
भुजबळ यांनी आपल्या नातलगांच्या नावे विविध कंपन्या असल्याचे दाखवून महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा सोमैय्या यांचा आरोप आहे. मात्र महाराष्ट्र सदनाचे काम बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर झाले असून त्यात राज्य शासनाने एक रुपयाही खर्च केलेला नाही. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असे म्हणता येणार नाही; असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारचे उद्घाटन समारंभाचे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले होते. मात्र सोमैय्या यांच्या आरोपानंतर या कार्यक्रमाला येण्यास त्यांनी नकार दिला आहे.
