मुंबई: मुलीसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एका महिलेने स्वत:ला मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले. मात्र हा प्रकार लक्षात येताच मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावला. बारा डब्यांची गाडी या मायलेकराच्या अंगावरून गेली. आई जागीच गतप्राण झाली. मात्र ‘देव तारी; त्याला कोण मारी; या उक्तीचा प्रत्यय देत ती चिमुरडी मात्र बचावली.
आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खार-वांद्रे रेल्वे फाटकाजवळ रसिला कीर्तीकुमार रावल (वय ३६, रा. कुटीर चाल; जवाहर नगर; खार, मुंबई) यांनी आपल्या नऊ वर्षाच्या विनल या मुलीसह चर्चगेटकडे जाणार्या लोकलखाली स्वत:ला झोकून दिले. रसिला या जागीच ठार झाल्या. मात्र मुलगी जिवंत असल्याचे चर्चगेटला कामावर निघालेले रेल्वे गार्डच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रुळावर धाव घेऊन मुलीला प्रथम वांद्रे स्थानक प्रमुखांच्या कार्यालयात आणि नंतर भाभा रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला इजा झाली असली तरीही ती सुखरूप असल्याचे डॉक्टरनी सांगितले.
