विंडोज ८- आक्टोबरच्या २६ ला येणार बाजारात

मायक्रोसॉफ्टच्या नेक्स्ट जनरेशन ऑफ सिस्टिम विंडोज ८ आक्टोबरच्या २६ तारखेला बाजारात आणण्यात येणार आहेत असे  मॅनेजर ले ब्लॅक यांनी जाहीर केले आहे. ही नवी सिस्टीम जगभरातील पर्सनल कॉम्प्युटर, स्मार्टफोन, टॅब्लेट या सार्‍यांसाठी उपयुक्त ठरणार असून त्याचे डिझायनिंग करताना ही बाब लक्षात घेऊनच ती तयार केली गेली आहे. युनिट बॉस स्टीफन सिनोर्फकाय या संबंधी बोलताना म्हणाला की ही सिस्टीम १०९ भाषांत ऑपरेट करता येणार असून जगभरातील २३१ मार्केटमधून ती उपलब्ध केली जाणार आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेट उत्पादकांसाठी ती ऑगस्टमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या उत्पादनांत त्यानुसारच हार्डवेअर डेव्हलप केले जाणार आहे.

 विंडोज ७ चे ६३० दशलक्ष परवाने विक्री करण्यात आले आहेत. सर्व महत्त्वाचे उद्योग, कार्यालये ,सरकारी कार्यालये यांत हीच सिस्टीम २००९ पासूनच  वापरली जाते आहे. मायक्रोसॉफट स्वतःच्या सरफेस टॅब्लेटसाठीही विंडोज ८ वापरणार असून या वर्षातच हा टॅब्लेट लाँच केला जाणार आहे. सध्या स्मार्टफोन बाजारात अॅपल आणि गुगलचा वरचष्मा आहे मात्र मायक्रोसॉफ्ट या क्षेत्रातही आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी आवश्यक ते सारे करण्याची कंपनीची तयारी आहे.