नवी दिल्ली, दि.१९ – राजधानी आणि शताब्दीसारख्या रेल्वेगाड्या त्यांच्या सोयी-सुविधांमुळे भारतातच नाही, तर परदेशातही लोकप्रिय आहेत. आता या रेल्वेने होणारा प्रवास संगीतमय करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास होणार संगीतमय
राजधानी आणि शताब्दीमधून प्रवास करताना उस्ताद बिस्मिल्ला खॉं, एनटी राजरत्नम पिल्ले, पं. पन्नालाल घोष यांसारख्या दिग्गजांचे वाद्यवादन प्रवाशांना ऐकायला मिळणार आहे. राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रत्येक स्टेशन आल्यावर त्याची घोषणा करण्यात येते. तेथूनच प्रत्येक डब्यात संगीताच्या विविध रागदारी वाजवण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या उपक्रमासाठी `ऑल इंडिया रेडिओ लायब्ररी’कडून सहकार्य मिळणार आहे. तसेच याबाबत `ऑल इंडिया रेडिओ’ने देखील परवानगी दिली आहे. उत्तर हिंदुस्तानी आणि दाक्षिणात्य वादकांच्या वादनाचा आस्वाद प्रवाशांना यापुढे घेता येणार आहे.
यात बिसमिल्ला खॉं यांची शहनाई, उस्ताद अल्लाउद्दिन खॉं यांचे सरोदवादन, द्वाराम व्यंकटस्वामी नायडू यांचे व्हायोलीनवरील काही अनवट राग, टी. आर. महालिंगम यांची बासरी याबरोबरच अनेक वादकांच्या दुर्मिळ रेकॉर्डसची म्युझिकल ट्रीट प्रवाशांना मिळणार आहे.
याशिवाय ज्या भागातून रेल्वे जाते, त्यानुसार संगीताची निवड करण्यात येणार आहे. राजधानी आणि शताब्दीमध्ये दूरचित्रवाणी दाखविण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती रेल्वे अधिकार्यांनी दिली.
