
जळगाव, दि. १८ – स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांनी राज्यभर खळबळ माजली असली, तरीही या अर्भकांचा जन्मण्यापूर्वीच गळा घोटण्याच्या प्रकारांना आळा बसल्याचे दिसून येत नाही. शहरातील दमाणी रुग्णालयात शौचालयाच्या चेंबरमध्ये मंगळवारी एक स्त्री अर्भक सापडले. गर्भपात करून ते अर्भक शौचालयात टाकल्याचा पोलिसांचा कयास आहे.
आज सकाळी बी. जे. मार्केटमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा दमाणी यांच्या रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबून रस्त्यावर आले. हे पाणी शौचालयात तुंबल्याचे लक्षात आल्यावर चेंबर साफ करताना त्यात स्त्री अर्भक आढळून आले. स्थानिक नागरिकांनी माहिती देताच महापालिकेचे आरोग्य पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र यावेळी रुग्णालयात कोणीही नसल्याने याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.
या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निर्मला शर्मा चौकशी करीत आहेत.
